देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाटलांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की मी राज्याचा गृहमंत्री आहे मात्र पोलीस पाटील हे त्यांच्या त्यांच्या गावाचे गृहमंत्रीच आहात हे विसरु नका असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तुमचा मोठा वाटा आहे. तुम्ही सगळ्यांनी माझा सत्कार केला याचं समाधान आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाटील संघटनेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
खरं म्हणजे गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्याच जास्त खाव्या लागतात. काही लोकांचा शौक असा आहे की सकाळी उठून कॅमेरासमोर येऊन माझा राजीनामा मागितल्याशिवाय त्यांना अन्नच पचत नाही. एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर त्यांना अपचन होतं. पण पोलीस पाटील संघटना अशी आहे की ज्यांनी मागे लागून त्यांचं काम करुन घेतलं. पण कुणी काम केलं ते ही संघटना विसरली नाही. आज मला इथे बोलवून माझा सत्कार केलात त्याबद्दल आपले आभार मानतो. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मानाच्या पदाला सन्मान मिळणं आवश्यक असतं. काळाच्या ओघात व्यवस्था बदलली, लोकशाहीत अनेक संस्था तयार झाली. व्यवस्था उभी राहिली मानाच्या पदाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे का? अशी शंका उपस्थित केली गेली. मला पोलीस पाटील संघटनेचे लोक भेटायचे तेव्हा मला ते सांगायचे आम्हाला हिणवलं जातं, बिन पगारी फुल अधिकारी. मी त्यांना म्हटलं काळजी करु नका, तुम्ही काळजी करु नका फुल पगारी आणि फुल अधिकारी असाच दर्जा आम्ही तुम्हाला देणार आहोत. यावेळी आपण संघटनेचे लोक मला भेटले तेव्हा मी चंग बांधला, मानाच्या पदाला आम्ही १५ हजार रुपये मानधन केलं. तुम्ही काळजी करु नका, दोन तीन दिवसांपूर्वी सांगितलं असतं मी पैसे खात्यात जमा करुनच आलो असतो. सोमवारी जी. आर. निघून पैसे खात्यात गेले पाहिजेत असा आदेश मी दिला आहे. चार महिन्यांचे पैसे खात्यात जातील आणि दर महिन्याला योग्य प्रकारे तुमच्या खात्यात येतील असंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सरकारमध्ये काम चालतं फाईल गोगलगायीच्या गतीने चालते. गोगलगायीच्या पावलाने फाईल चालली की आम्हाला धक्का द्यावा लागतो. तसा आज धक्का मी दिला आहे. या निमित्ताने मी सांगू इच्छितो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगून ठेवलं आहे की म्हणोनी गावी अन्याय केला त्याचा प्रतिकारच झाला पाहिजे. दुष्टाशी दया करुनी सोडुनी द्यावे नसे हा धर्म. कुठल्याही गरीबाला त्रास झाला तर त्रास देणाऱ्याला शासन झालं पाहिजे. हे काम कुणी करत असेल तर पोलीस पाटील यांच्यामुळे होतं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.