मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंधरा दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी मुंबई- नाशिक महामार्गावर प्रवास करत शहापूरपर्यंत महामार्गाचा आढावा घेतला होता. त्यानंतर महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजवण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यानंतरही महामार्गावर खड्डे बुजले गेले नाही. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची समस्या जैसे थे आहे. अद्यापही महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांच साम्राज्य आहे. महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी दिलेल्या आदेशानंतरही वाडीवऱ्हे, विल्होळी, घोटी परिसरात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
काय झाले मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे
महामार्गावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. यामुळे मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई या प्रवासाला अधिक वेळ लागत आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्ग प्राधिकरणाला खड्डे बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. त्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर घोटी, सिन्नर फाटा परिसरातील रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा शुक्रवारी लागल्या आहेत. यामुळे मुंबई-नाशिक प्रवास रस्ते मार्गांऐवजी रेल्वेमार्गाने अनेक जण करु लागले आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही नाशिकमध्ये बैठक घेतली होती. त्यात त्यांनीसुद्धा रस्त्यातील खड्डे बुजवून तात्काळ रस्ते चांगले करण्याचे आदेश दिले होते. तसेच यासंदर्भात दिरंगाई झाली तर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. गणेशोत्सवाच्या आत खड्डे बुजवण्याचे आदेश त्यांनी काढले होते. परंतु अजूनही काम सुरु नाही.