कौन्सिल ऑफ गव्हर्नमेंट (CHG) च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आलं आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, सीएचजीची बैठक 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गेल्या आठ वर्षांत पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांना पाकिस्तानकडून निमंत्रित करण्यात आलं आहे.
पाकिस्तानच्या निमंत्रणानंतर आता तणावपूर्ण संबंधांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाणार की, त्यांच्या जागी भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एखाद्या मंत्र्याला इस्लामाबादला पाठवणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. दरम्यान, सध्या SCO चे अध्यक्षपद पाकिस्तानकडे आहे.
पंतप्रधान मोदी कझाकिस्तानला गेले नाहीत
CHG बैठक ‘राज्य प्रमुखांच्या परिषदे’नंतर निर्णय घेणारी दुसरी सर्वात महत्त्वाची संस्था आहे, जी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पंतप्रधान मोदी हे सहसा राष्ट्राध्यक्षांच्या शिखर परिषदेत सहभागी होत असतात, परंतु या वर्षी जुलै महिन्यात संसदेच्या अधिवेशनादरम्यान तारखांच्या वादामुळे ते कझाकिस्तानला गेले नाहीत. त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सीएचजीच्या बैठकीत जे नेते उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांना अक्षरशः या बैठकीत सामील करून घ्यायचं की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही SCO चे पूर्ण सदस्य आहेत. या संघटनेचं नेतृत्व चीन आणि रशिया करत आहे, त्यामुळे भारत याबाबत अत्यंत सावध आहे. या संघटनेत चीनचा प्रभाव वाढू नये, अशी भारताची इच्छा आहे, असं झाल्यास ते पाश्चिमात्य विरोधी संघटनेचं रूप घेऊ शकतं.
भारताकडून कोण जाणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष
भारत आणि पाकिस्तानात बऱ्याच काळापासून तणाव सुरू आहे. तरिसुद्धा काही असे मुद्दे आहेत, जिथे भारत आणि पाकिस्तानंन एकत्र येऊन निर्णय घेतले आहेत. 2023 मध्ये भारतात झालेल्या एससीओच्या बैठकीत पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी भारताच्या बाजूने सीएचजी बैठकीला कोण उपस्थित राहणार याबाबत सध्या कोणताही निर्णय झालेला नाही.