‘महाराजांच्या काळातील शिक्षा.. पुन्हा कृतीत आणण्याची गरज’; बदलापूर घटनेबाबत रितेश देशमुखची मागणी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

बदलापूर इथल्या प्रथितयश आदर्श विद्या मंदिर शाळेमध्ये चार वर्षांच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर मंगळवारी बदलापुरात नागरिकांचं रौद्ररुप पहायला मिळालं. पालक आणि नागरिकांनी सकाळी सहा वाजल्यापासून शाळेसमोर आंदोलन सुरू केलं. काही आंदोलकांनी शाळेत तोडफोडही केली. त्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकाकडे मार्चा वळविला. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आंदोलकांनी तब्बल 10 तास कल्याण-कर्जत रेल्वे मार्ग रोखून धरला. बदलापूरमधल्या या घटनेबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेता रितेश देशमुखनेही एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ट्विट करत या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

 

रितेश देशमुख-
‘एक पालक म्हणून मी पूर्णपणे दुखावलोय, वैतागलोय आणि चिडलोय. दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केलं. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वत:च्या घराइतकीच सुरक्षित जागा असायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना जी शिक्षा दिली, चौरंग – हेच कायदे आपल्याला पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे.’

 

आदर्श शाळेत गेल्या आठवड्यात दोन चार वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं होतं. पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तास लावले आणि शाळा प्रशासनानेही घटनेकडे दुर्लक्ष केल्याने शहरात संतापाची लाट पसरली. शहरातील काही राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर बंदची हाक देत आंदोलनाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत सकाळी सहा वाजल्यापासून शाळेबाहेर पालकांनी निदर्शनं केली.

 

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *