पालक आणि मुलांमध्ये एक मजबूत बंध निर्माण होण्यासाठी मैत्रीचं नातं तयार होणे महत्वाचे असते. कारण मैत्रीचं नातं निर्माण झाल्यावर मुलं सर्वकाही शेअर करू शकतील. जे त्यांच्या सुरक्षिततेसाठी चांगले असेल. चला तर हेच मैत्रीचं नातं पालक आणि मुलांसोबत कसे निर्माण होईल याबद्दलच्या या टिप्स जाणून घेऊयात…
प्रत्येक पालक आपल्या मुलांचे योग्य पालन पोषण व्हावे यासाठी मुलांना चांगले संस्कार देत असतात. तसेच पालकांचे राहणीमान आणि वागणे यातुन मुलं सर्वकाही शिकतात. पण जेव्हा तुम्ही मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीला सारखे ओरडत बसलात तर मुलं जसजसे मोठी होतात तसतसे ते अनेक गोष्टी लपवू लागतात आणि तुमच्यात आणि मुलांमध्ये अंतर येऊ लागते. यासाठी प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांसोबत मित्रांसारखे राहावे, जेणेकरून मुले त्यांना सर्व गोष्टी सांगू शकतील आणि पालकांचा सल्ला घेऊ शकतील.
मुलांसोबत मित्रांसारखे राहणे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा ते त्यांच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतील तेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल, ते काय करत आहेत आणि कोणासोबत बाहेर जात आहेत हे कळेल. हे मुलांच्या सुरक्षिततेसाठी देखील महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा मुले घरी खरे बोलत नाहीत किंवा पालकांकडून ओरड्या बसण्याच्या भीतीने खोटे बोलत राहतात, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलासोबत मित्रांसारखे राहू शकता, यासाठी आजच्या लेखात सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला मदत करतील.
मुलाच्या भावना समजून घ्या
बहुतेक पालक त्यांच्या मुलांवर छोट्या गोष्टींवरून रागावतात. पण त्यांच्यावर रागवण्याऐवजी तुम्ही त्यांचे ऐकले पाहिजे आणि त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. अशातच समजा जर तुमच्या मुलाला परीक्षेत कमी गुण मिळाले तर त्यांना फटकारण्याऐवजी त्यामागील कारण त्यांना समजवून सांगा. जेव्हा मुलांना असे वाटते की त्यांना एखाद्या गोष्टीसाठी फटकारण्याऐवजी तुम्ही त्यांना समजून घेता, तेव्हा ते तुम्हाला सर्वकाही सहजपणे शेअर करतील.
मुलांसोबत वेळ घालवा
आजकाल पालक ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असतात. सकाळी ऑफिसला जातात आणि संध्याकाळी घरी परततात. अशा परिस्थितीत त्यांना मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. पण तुम्ही जेव्हा उरलेल्या वेळेत त्यांच्यासोबत वेळ घालवता तेव्हा मुलांचे आवडते काम जसे की त्यांच्यासोबत खेळ खेळणे, त्यांचा आवडीचा मुव्ही पाहणे, किंवा त्यांना खरेदी करायला घेऊन जाणे. अशाने मुलांसोबत तुमचं प्रेम आणि नातं अधिकचं घट्ट होत.
त्यांच्या मताला महत्त्व द्या
मुलांचे त्यांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल स्वतःचे मत असू शकते. अशा परिस्थितीत मुलांशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, त्यांचे ऐका आणि त्यांच्या मताला महत्त्व द्या. जसे की, शाळेत एखादा विषय निवडताना तुम्ही त्यावर चर्चा केली पाहिजे. यामुळे तुमची मुलं स्वावलंबी बनतात आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता देखील विकसित होते.
शिक्षा करण्याऐवजी समजावून सांगा
चुका प्रत्येकाकडून होत असतात. पण जेव्हा मुलं चुकतात तेव्हा अनेक पालक त्यांना मारतात ओरडतात. पण यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जर सततच्या ओरडण्याने तुमची मुलं नंतर मोठी चूक केली तर त्याबद्दल सांगणार नाहीत. अशातच मुलं चुकतात तेव्हा त्यांना समजावून सांगा की चूक काय होती आणि त्यातून काय शिकता येईल. त्यामुळे त्यांचे किंवा इतर कोणाचे काय नुकसान होऊ शकते.
विश्वास दाखवा
मुलांचे ऐका आणि त्यांना सांगा की तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे. यामुळे ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आणि तुमच्याशी खोटे बोलणार नाहीत. जर ते तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा घटनेबद्दल सांगत असतील तर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका.
त्यांच्या मित्रांबद्दल आणि छंदांबद्दल जाणून घ्या
जर तुम्हाला तुमच्या मुलाशी मैत्री करायची असेल तर त्यांच्या मित्रांबद्दल आणि छंदांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या मित्रांबद्दल त्यांना विचारा, त्यांच्या छंदांबद्दल त्यांच्याशी बोला. यामुळे पिढीतील अंतर कमी होण्यास मदत होऊ शकते.
मुलांना फिरायला घेऊन जा
मुलांना आठवड्याच्या शेवटी बाहेर फिरायला त्यांचा आवडत्या ॲक्टिव्हिटी करायला घेऊन जा. यामुळे त्यांना इतर ठिकाणे एक्सप्लोर करण्याची संधी मिळेलच, शिवाय ते तुमच्यासोबत जास्त वेळ घालवू शकतील आणि त्यांना बरे वाटेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
.