एकनाथ खडसेंचे जावई डॉ. प्रांजल खेवलकरांच्या अटकेप्रकरणी पोलिसांनी खासगी जीवन जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा दावा अॅड. असीम सरोदे यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी खासगी पार्टीला रेव्ह पार्टीचे स्वरुप दिले, कोकेनचा पुरावा प्लॅन्ट करुन त्या लोकांना समाजापुढे आरोपी असल्याचं चित्र उभं केल्याचा दावाही त्यांनी केला. हे प्रकरण उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता असून पुणे पोलिसांची अडचण वाढणार असल्याचा दावा असीम सरोदे यांनी केला.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर आणि इतर सात जणांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणी अटक केली. या प्रकरणात पुणे पोलिसांनी राजकीय उद्देश ठेऊन दृश्यम चित्रपटाप्रमाणे खोटं चित्र रंगवल्याचा दावा असीम सरोदे यांनी केला. घरामध्ये दारू पिणे हा गुन्हा नाही, पण पोलिसांनी याला रेव्ह पार्टीचे स्वरुप दिल्याचं सरोदे म्हणाले.
पोलिसांनी खासगी पार्टीला रेव्ह पार्टीचे स्वरुप दिले
असीम सरोदे म्हणाले की, “विश्वास नांगरे पाटील हे पुण्याचे पोलीस अधीक्षक असताना त्यांनी एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली होती. रेव्ह पार्टीमध्ये मोठ्या आवाजातील संगीत असतं, लोकांची मोठी संख्या असते. तसेच त्या ठिकाणचे लोक हे अत्यंत तोडक्या कपड्यांमध्ये असतात. या पार्टीत अफू, गांजा आणि इतर नशिल्या पदार्थांचा समावेश असतो. याला रेव्ह पार्टी म्हणतात. आता पुणे पोलिसांनी जी कारवाई केली ती केस वेगळी आहे. ज्या सात लोकांना पकडण्यात आलं आहे ते एका घरामध्ये दारू, बीयर पित होते. घरामध्ये दारू पिणे हा काही गुन्हा नाही. पण पोलिसांनी या प्रकरणाला राजकीय उद्देशाने रेव्ह पार्टीचे स्वरुप दिलं आहे.”
पोलिसांचा राजकीय वापर सुरू आहे. पोलिसांनी त्या बंगल्यात जमलेल्या लोकांच्या राईट टू प्रायव्हसीचा गंभीर प्रकारे भंग केला आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलीस अडचणीत येऊ शकतात असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं.
पोलिसांनीच पुरावे पेरले
असीम सरोदे यांनी या प्रकरणी पोलिसांवरच आरोप केला आहे. ते म्हणाले की, “प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. प्लांटेड पुराव्यांच्या आधारे डॉ. खेवलकर आणि इतरांना गुन्हेगार ठवरण्याचे कट कारस्थान हे पोलिसांनीच रचले आहे. पोलिसांनी दोन ग्रॅम कोकेन सापडल्याचा दावा केला आहे. परंतु त्यांनी सात मिलिग्रॅम कोकेन जास्त भरलं पाहिजे अशी व्यवस्था करून या लोकांना बेल मिळणार नाही अशी व्यवस्था केली. पोलिसांनी एक चित्र तयार केलं. राजकीय निर्देशाखाली ते वागले.”
दृश्यम चित्रपटाप्रमाणे चित्र रंगवलं
दृश्मय चित्रपटाप्रमाणे पोलिसांनी एक चित्र लोकांच्या मनावर बिंबवलं. त्याची आधीच तयारी केली होती. पोलिसांनी त्याचा एक व्हिडीओ व्हायरल केला. जे लोक आरोपी नाहीत त्यांचा व्हिडीओ व्हायरल करुन पोलिसांनी त्यांच्यावरचा संशय समाजात आरोपी म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असा आरोप असीम सरोदे यांनी केला.
खासगी जीवन जगण्याच्या हक्काचं उल्लंघन
असीम सरोदे म्हणाले की, “व्हिडीओ व्हायरल करणे म्हणजे व्यक्तीचे खासगी जीवन जगण्याच्या हक्कांचं गंभीर उल्लंघन आहे. ही चूक पोलिसांना भोवणार आहे. पोलिसांचा वापर हा राजकीय स्वार्थातून केला जात आहे. हे राजकीय पोलिसिंग थांबलं पाहिजे.”
न्यायालयात येण्यापूर्वीच पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल केला
या केसचे इतर धागेदोरे समोर येत आहेत. उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी हा व्हिडीओ काढणे आणि व्हायरल करणे, न्यायालयात येण्यापूर्वीच तो व्हिडीओ व्हायरल करणे, एकनाथ खडसे यांची बदनामी करण्यासाठी हे सर्व केल्याचं दिसतंय. पोलिसांनी स्वतःच्या अंगझडतीचा कोणताही पंचनामा न करता त्या ठिकाणी धाड टाकली आणि कोकेन पुरावा प्लँटेड केला.