गेल्या काही वर्षांमध्ये वैद्यकीय क्षेत्राने चांगली प्रगती केली आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये एका डॉक्टरने एका पाळीव उंदरावर शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे. 50 मिनिटे चाललेल्या या शस्त्रक्रियेद्वारे उंदराच्या पोटातून 240 ग्रॅम वजनाचा ट्यूमर काढण्यात आला आहे. उंदराला भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे उंदराला जीवदान मिळाले आहे. आता हा उंदीर पूर्ण स्वस्थ असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हुसेनाबाद येथील अभय श्रीवास्तव यांच्याकडे मिकी नावाचा दोन वर्षांचा पांढरा पाळीव उंदीर आहे. मिकी चार महिन्यांपासून आजारी होता. तो व्यवस्थित खात पीत नव्हता. या मुक्या प्राण्याच्या वेदना पाहून श्रीवास्तव यांनी त्याच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला.
अभय आपल्या उंदराच्या उपचारासाठी बऱ्याच डॉक्टरांकडे गेले. मात्र उंदराची शस्त्रक्रिया करणे हे धोक्याचे असल्याने अनेकांनी त्याला नकार दिला. त्यानंतर अभय श्रीवास्तव हे शाहगंज येथे असलेल्या डॉक्टरांना भेटायला गेले. त्यावेळी पालिवाल पेट्स क्लिनिकचे वरिष्ठ डॉक्टर आलोक पालिवाल यांनी उंदरावर उपचार करण्यास परवानगी दिली.
शस्त्रक्रियेची तारीख ठरल्यानंतर अभय आणि त्यांच्या मुलीने उंदराला रुग्णालयात नेले. डॉक्टर पालिवाल यांनी उंदराची तपासणी केली तेव्हा त्यांना त्याच्या पोटात ट्यूमर असल्याचे समजले. त्यानंतर डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक उंदराला भूल दिली. त्यानंतर शस्त्रक्रिया सुरू केली. 50 मिनिटे चाललेल्या या शस्त्रक्रियेत उंदराच्या पोटातून 240 ग्रॅम वजनाची गाठ काढण्यात आली.
उंदराच्या पोटातून निघालेली मोठी गाठ पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. या शस्त्रक्रियेनंतर उंदराला टाके लावण्यात आले आहेत. सध्या उंदीर पूर्णपणे शुद्धीवर आहे. पुढील दहा दिवस त्याच्यावर नजर ठेवी जाणार आहे. त्यानंतर उंदीर पूर्णपणे निरोगी होईल.
डॉक्टर काय म्हणाले?
याबाबत बोलताना डॉक्टर आलोक पालीवाल म्हणाले की, अभय श्रीवास्तव हे त्यांच्या पाळीव उंदराच्या उपचारांबद्दल चिंतेत होते. या उंदराच्या पोटात 240 ग्रॅम वजनाची गाठ होती. ही शस्त्रक्रिया खूप आव्हानात्मक असते, कारण उंदराला काळजीपूर्वक भूल द्यावी लागते. डोस कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. मात्र आता शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आणखी दहा दिवसांनंतर उंदीर पूर्णपणे तंदुरुस्त होईल.