केरळचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्टचे ज्येष्ठ नेते अच्युतानंदन यांचे निधन

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांचे सोमवारी वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर २३ जून रोजी अच्युतानंदन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते उपचार घेत होते. मात्र दुपारी ३.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

माकपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले अच्युतानंदन हे कामगारांच्या हक्कांचे, जमीन सुधारणांचे आणि सामाजिक न्यायाचे आजीवन समर्थक होते. केरळच्या राजकीय इतिहासातील ते एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. २००६ ते २०११ पर्यंत त्यांनी केरळचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि सात वेळा राज्य विधानसभेवर निवडून आले, तीन वेळा विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.

२० ऑक्टोबर १९२३ रोजी अलाप्पुझा जिल्ह्यातील पुन्नाप्रा येथे जन्मलेल्या अच्युतानंदन यांचे सुरुवातीचे आयुष्य कष्ट आणि गरिबीने भरलेले होते. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी शिक्षण सोडले. कापडाच्या दुकानात आणि कारखान्यात कामगार म्हणून काम केल्यानंतर ते राजकारणाकडे वळले. १९४० च्या दशकात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते पी. कृष्णा पिल्लई यांच्या प्रेरणेने त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षापासून वेगळ्या झालेल्या माकपच्या ३२ संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. अच्युतानंदन यांचे पार्थिव तिरुवनंतपुरम येथील एकेजी स्टडी अँड रिसर्च सेंटरमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. अलाप्पुझा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे केरळचे माकपचे सचिव एम. व्ही. गोविंदन यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *