गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन राजकारण तापले आहे. महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयाला कडाडून विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती लादण्याच्या प्रयत्नांवरून ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही, पण कोणत्याही भाषेची सक्ती मराठी माणूस सहन करणार नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही. पण तुम्ही मारुती स्त्रोत्र का विसरायला लावता, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
“मराठी माणसाचं एक वैशिष्ट्ये आहे. तो आतातायीपणा करत नाही. तो विघ्नसंतोषी नाही. तो कुणावर अन्याय करत नाही. पण त्याच्यावर अन्याय झाला तर तो सहन करत नाही. पण सहनशीलतेचा कडेलोट झाल्याने तो आता पिसाळलाय. जसा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी पेटला होता. तसाच आता पेटला. कोणत्याही भाषेला आमचा विरोध नाही. तुम्हाला जेवढ्या भाषा शिकायच्या शिका. पण जबरदस्ती करू नका. मी मीडियासमोर हिंदी बोलतो. हिंदीचा द्वेष नाही. विरोध नाही. पण सक्ती नको. आपला देश हा संघराज्य पद्धत आहे. अनेकतेत एकता आहे. त्याची गंमत घालवून तुम्ही जबरदस्ती एकता लादत आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
किती काळ हे सहन करायचं?
“मराठी माणसांचं एक वैशिष्ट्य आहे, मराठी माणूस हा आततायीपणा करणारा नाही. मराठी माणूस हा विघ्नसंतोषी नाही. मराठी माणूस हा इतर वेळेला मी बरं आणि माझं काम बरं असा असतो. कोणावरही अन्याय करत नाही. हाच मराठी माणूस जर त्याच्यावर अन्याय झाला तर सहनही करत नाही. आता सहनशीलतेचा कडेलोट व्हायला लागला म्हणूनच मराठी माणूस पिसाळलाय, जसा संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळेला तो पेटला होता. तसाच तो आता पेटलेला आहे. कारण किती काळ हे सहन करायचं? आमची चूक काय असं त्याला वाटू लागलंय. शिवसेनाप्रमुखही तेच सांगायचे, माझे आजोबाही तेच सांगायचे. जितक्या भाषा तुम्हाला शिकायच्या आहेत तितक्या भाषा तुम्ही शिका. पण कुणावरही जबरदस्ती करू नका. तुम्ही स्वतः राज्यसभेत हिंदीत बोलता. मीडियासमोर असताना जर मला हिंदीत विचारलं, तर मी हिंदीत उत्तर देतो. आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही, पण हिंदीची सक्ती नकोच”, असे उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितले.
आमच्यावर दुसरी भाषा लादण्याचा आग्रह धरू नका
“तुम्ही वन नेशन-वन इलेक्शन, सगळंच वन…वन…वन… वन… करत चाललेला आहात. आपला देश हा संघ राज्यपद्धत आहे. आम्ही महाराष्ट्रात मराठी आहोत, पण देशाचा विचार केला तर हिंदू आहोत, गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत. पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत, पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. तसंच आम्ही त्या त्या भाषेचा आणि त्या त्या प्रांताचा मान राखतोच. प्रादेशिक अस्मितेचा मान आणि अभिमान असलाच पाहिजे. पण जेव्हा देशाचा विचार करतो तेव्हा आम्ही हिंदू म्हणून एकत्र आहोत. देशप्रेमी म्हणून एकत्र आहोत. अनेकता में एकता म्हणजे काय? त्या अनेकतेची जी एक गंमत आहे ती घालवून किंवा त्याची जी एकजूट आहे ती घालवून जी जबरदस्ती लादताय… म्हणूनच मी परवाच्या भाषणात बोललो की, आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही, पण आमचं मारुती स्तोत्र का विसरायला लावताय? आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो… तुम्ही हनुमान चालिसा म्हणा… देव एकच आहे, तो हनुमान. त्यालाच आम्ही मानतो. तुम्हीही त्यालाच मानता. पेटवण्याचा प्रयत्न भाजप करतोय. पण तो पेटत नाहीये. याचं कारण, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. जसं आम्ही इतरत्र मराठी लादण्याचा आग्रह करत नाही तसं आमच्यावर दुसरी भाषा लादण्याचा आग्रह धरू नका”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.