CREAच्या अहवालानुसार मुंबई चेन्नई-कोलकात्यापेक्षाही जास्त प्रदूषित

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

‘स्वप्नांची मायानगरी’ अशी ओळख असलेल्या मुंबईतील वातावरण दिवसेंदिवस ढासळू लागले आहे. मुंबईला कधीकाळी स्वच्छ आणि मोकळ्या हवेचे शहर म्हणून ओळखले जात असले तरी २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांच्या हवा प्रदूषणाच्या आकडेवारीने मोठी चिंता वाढवली आहे. ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ (CREA) या नामांकित संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मुंबई शहरातील हवेतील PM2.5 या विषारी कणांचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय मानकांपेक्षा कमी आहे. मुंबईतील सायन आणि देवनार भागातील हवा चेन्नई-कोलकात्यापेक्षाही जास्त प्रदूषित असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईचे हॉटस्पॉट इतर महानगरांपेक्षाही प्रदूषित
या अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे देवनार, सायन, कांदिवली पूर्व आणि बीकेसी यांसारख्या मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये प्रदूषणाची पातळी ही प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे. ही प्रदूषणाची पातळी चेन्नई, कोलकाता, पद्दुचेरी आणि विजयवाडा यांसारख्या इतर किनारपट्टीच्या शहरांपेक्षाही अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरात असे उच्च प्रदूषित क्षेत्र असणे हे धोक्याचे संकेत आहेत.

CREA अहवालाचे गंभीर निष्कर्ष
CREA ने देशातील २३९ शहरांतील हवेच्या गुणवत्तेवर आधारित हा सविस्तर अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, मुंबईतील देवनार हे किनारपट्टीवरील सर्वात प्रदूषित ठिकाणांपैकी एक ठरले आहे. केवळ देवनारच नाही, तर मुंबईतील इतर काही भागांमध्येही PM2.5 ची पातळी ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर (µg/m³) या राष्ट्रीय मर्यादेपेक्षा (National Ambient Air Quality Standards – NAAQS) अधिक आढळली आहे.

याउलट, दक्षिण भारतातील चेन्नई आणि पुद्दुचेरीतील निवासी भागांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या हवा अधिक स्वच्छ आढळून आली आहे. विजयवाडा आणि कोलकात्यामध्ये काही ठिकाणी प्रदूषण असले तरी, ते मुंबईतील देवनारसारख्या भागांइतके सातत्यपूर्ण आणि गंभीर नाही, असे अहवालात स्पष्ट म्हटले आहे.

भारतातील हवा आरोग्यासाठी सुरक्षित नाही
CAAQMS (Continuous Ambient Air Quality Monitoring Stations) च्या आकडेवारीनुसार, पाहणी केलेल्या २३९ शहरांपैकी १२२ शहरांनी NAAQS ची मर्यादा ओलांडली आहे, हे चित्र भीतीदायक आहे. याहूनही चिंतेची बाब म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निश्चित केलेला ५ µg/m³ हा अधिक कडक निकष एकाही भारतीय शहर पूर्ण करता आलेला नाही. याचाच अर्थ भारतातील बहुतांश शहरांतील हवा जागतिक मानकांनुसार आरोग्यासाठी सुरक्षित नाही, असे पाहायला मिळत आहे.

तातडीच्या उपाययोजनांची नितांत गरज
मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरातही अशा उच्च प्रदूषणाची नोंद होत असल्याने, स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांचे वाढते उत्सर्जन, बांधकाम प्रकल्प आणि कचरा जाळणे ही प्रदूषणाची प्रमुख कारणे मानली जातात. मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये वाढलेले प्रदूषण लक्षात घेता, महानगरपालिका आणि राज्य प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, जेणेकरून मुंबईकरांना शुद्ध हवा मिळू शकेल.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *