साप्ताहिक राशिभविष्य: २९ जून ते ५ जुलै २०२५

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

 

मेष : अंदाजे कृती टाळा
एक तारखेला दुपारनंतर दिनांक २ व ३ हे संपूर्ण दोन दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी कसरतीचा राहील. तेव्हा या कालावधीत कोणतेही काम करताना नियोजन करा. नियोजन केल्याशिवाय काम करू नका, अन्यथा अडथळे येऊ शकतात. इतरांनी काय करावे काय करू नये यासाठी सल्ला देत बसू नका. कारण हा सल्ला अंगलट येऊ शकतो. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका. अंदाजे कृती करणे टाळा. त्याने नुकसान होऊ शकते. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाला कामामध्ये विशिष्ट जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. खर्च कमी करा. समाजसेवा करताना दूरदृष्टी ठेवा. मुलांचे लाड करा, पण शिस्त बिगडू देऊ नका. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा.

वृषभ : खर्च जपून करा
दिनांक ४, ५ या दोन दिवसांत धावपळ होईल. ज्या ठिकाणी काम करण्याची मानसिकता नाही अशाच ठिकाणी काम करावे लागेल, त्यामुळे तुमचे मन नाराज होईल. कारण नसताना वादविवाद होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. स्वत:साठी वेळ द्या. काम उशिरा झाले तरी चालेल, पण ते चोख करा. आपल्या वैयक्तिक गोष्टी इतरांसमोर मांडू नका. बेकायदेशीर गोष्टींपासून लांब राहा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील निर्णय परिस्थितीनुसार घ्या. उधारीचे व्यवहार टाळा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. खर्च जपून करा. राजकीय क्षेत्रातील डावपेच वेळीच लक्षात घ्या. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. मुलांचे कोडकौतुक कराल. धार्मिक गोष्टींसाठी वेळ द्यावा लागेल.

मिथुन : निर्णय यशस्वी होतील
या सप्ताहात सर्वच दिवस चांगले आहेत. कोणत्याही दिवसांसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार नाही. दिवस चांगले असले की कामे वेळेत होतात हे लक्षात ठेवा. इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. आपली बाजू ज्यावेळी दुसऱ्यांसमोर व्यक्त करत असता, त्यावेळी समोरच्याला ते पटेलच असे नाही. सध्या मात्र तुमचे मत समोरच्याला पटणारे असेल. घेतलेले निर्णय यशस्वी होतील. चांगल्या गोष्टींसाठी पाठपुरावा करावा लागणार नाही. त्या सहज मार्गी होणार आहेत. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाला अधिकार पद प्राप्त होईल.आर्थिकदृष्टया ताणतणाव जाणवणार नाही. राजकीय क्षेत्रातील घडामोडींत बदल होतील. घरगुती वातावरण चांगले राहील. संतती सौख्य लाभेल. मानसिक समाधान लाभेल. अध्यात्मातील गोडी वाढेल. प्रकृती चांगली राहील.

कर्क : सवलत मिळेल
सप्ताह अनुकूल असेल तर सर्वकाही चांगले असते याचा अनुभव तुम्हाला या आठवड्यात येणार आहे. याच्या आधी कितीही प्रयत्न केले तरी म्हणावे असे यश येत नव्हते. सध्या मात्र तसे नाही. अनेक ठिकाणाहून प्रस्ताव येतील. हे प्रस्ताव चांगले असतील. बऱ्याच दिवसांनंतर चांगले दिवस आले आहेत असे वाटेल. काम करताना अडथळा येणार नाही. इतरांची मदत वेळेत मिळेल. काही वेळेला काही तांत्रिक गोष्टींचा सामना करावा लागत होता. सध्या तो करावा लागणार नाही. व्यवसायातील खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतील.

सिंह : स्वकर्तृत्व सिद्ध होईल
‘आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे’ सध्या असेच वातावरण आहे. महत्त्वाचे निर्णय आत्तापर्यंत घेतले जात नव्हते. सध्या मात्र ते घ्यायला हरकत नाही. प्रत्येक कामासाठी कोणावर तरी का होईना अवलंबून राहावे लागत होते. सध्या कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही. स्वत: स्वत:चे काम कराल.तुमचे स्वकर्तृत्व सिद्ध होईल.चांगल्या गोष्टींची चाहूल लागेल. इतरांकडून तुम्हाला शाब्बासकी मिळेल. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे अशी तुमची मानसिक्ता तर आहे आणि तसेच होईल. शुभकाम करण्याचा हा योग आहे असे समजा. या कालावधीत प्रतिभा उंचावेल.व्यापारवृद्धी चांगली होईल. नोकरदार वर्गाचा कामातील रुबाब वाढेल. आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. भावंडांशी संवाद साधाल. जोडीदाराचा आदर करा. प्रकृती चांगली राहील.

कन्या : आरोग्य जपा
दिनांक २९, ३० हे संपूर्ण दोन दिवस व १ तारखेला दुपारपर्यंत असे हे अडीच दिवस बेताचे राहतील. काय करावे काय करू नये याचे नियोजन जमणार नाही. कारण नसताना कामात वेळ जाऊ शकतो. आपले काम बाजूला राहील व इतरांचेच काम करावे लागेल. अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे कामाचा व्याप वाढेल आणि चिडचिड होईल. तेव्हा या अडीच दिवसांत काम उशिरा होणार आहे हे गृहीत धरून चाला. इतरांकडून अपेक्षा ठेवू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातील परिश्रम वाढतील. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी पार पाडावी लागेल.आर्थिक बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करताना भान ठेवा. ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. स्वत:चेही आरोग्य जपा.

तूळ : समतोल साधा
दिनांक १, २, ३ असे तीन दिवस फार चांगले नाहीत. दिवस चांगले नाहीत म्हणून काम करायचे नाही असे नाही. म्हणजे या दिवसांत फक्त महत्त्वाचे काम पुढे ढकलायचे. कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही. काम वेळेत होईल याची शक्यता कमी असते. केलेल्या नियोजनात अचानक बदल होतो. आपण फक्त प्रयत्न सोडायचे नाहीत. या कालावधीत आलेले कोणतेही प्रस्ताव स्वीकारू नका. कारण त्यातून फसवणूक होऊ शकते. प्रत्येक गोष्टीत समतोल कसा साधता येईल ते पाहा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात गुंतवणूक करताना विचार करा. नोकरदार वर्गाला वेळेत आणि काम मोजकेच करावे लागेल. आर्थिक उधारीचे व्यवहार करताना विचार करा. मुलांच्या बाबतीत निर्णय घेताना घाई करू नका. स्वार्थी मैत्रीपासून लांब राहा. मानसिकता जपा.

वृश्चिक : पत्रव्यवहार टाळा
दिनांक ४, ५ हे दोन दिवस शब्द जपून वापरा. स्पष्ट बोलल्यामुळे मतभेद वाढू शकतात. त्यापेक्षा न बोललेले चांगले. एखाद्या व्यक्तीचा राग आला तरी तो तुमच्या आचरणातून समोरच्या व्यक्तीला दाखवून देऊ नका. विचार करून बोलणे महत्त्वाचे राहील. एखादी जुनी आठवण काढून त्यात रमण्यापेक्षा चालू घडामोडींचा विचार करा. या दोन दिवसांत तुमच्या बाबतीत इतरांचा गैरसमज निर्माण होऊ शकतो. शिवाय कोणताच पत्रव्यवहार करू नका. तो टाळण्याचा प्रयत्न करा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातून जेवढे उत्पन्न मिळणारे तेवढे कष्टही वाढणार आहेत. नोकरदार वर्गाला मागील अनुभव विसरून चालणार नाही.आर्थिक बाबतीत सतर्क राहा. कौटुंबिक वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

धनू : भाग्योदय होईल
प्रत्येक आठवड्यात कोणता ना कोणता तरी दिवस डोकेदुखी वाढवणारा असतो. सध्या तुम्हीच दुसऱ्यांची डोकेदुखी वाढवणार आहात. म्हणजे काय, तुम्हाला जे साध्य करायचे ते साध्य करून घेणार. त्यासाठी इतरांना त्याचा त्रास झाला तरी चालेल. पण तुम्ही तुमची मनमर्जी पूर्ण करून घ्याल. दिवस चांगले असले की तुम्ही मात्र हात धुऊन घेता. एका कामाऐवजी दहा कामे कशी पूर्ण होतील याकडे तुमचा कल राहतो. हौसमौज मनोरंजन कसे होईल याकडे तुमचे जास्त लक्ष असते. महत्त्वाचे काम बाजूला ठेवता आणि मनोरंजनाला जास्त महत्त्व देता. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.राजकीय क्षेत्रात मानसन्मान मिळेल. घरगुती वातावरण आनंदाचे राहील. धार्मिक कार्य कराल. एकूणच सप्ताह भाग्योदयाचा राहील.आरोग्य ठणठणीत राहील.

मकर : शब्द जपून वापरा
दिनांक २९, ३० हे संपूर्ण दोन दिवस आणि १ तारखेला दुपारपर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल ते पाहा. एखादी गोष्ट नाही आवडली तर ती सोडून द्या. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. हे असेच झाले पाहिजे, हे असेच केले पाहिजे हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. अशामुळे वाद वाढतील. तुमची मानसिकता खराब होईल आणि तुम्ही रागाच्या भरात काय बोलून जाल कळणार नाही. बोलताना शब्द जपून वापरा. बेकायदेशीर गोष्टींच्या नादी लागू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील.व्यवसायात इतरांवर अवलंबून राहून कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरदार वर्गाला बढती मिळेल. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. भावंडांशी संवाद साधाल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

कुंभ : ज्येष्ठांचा आदर करा
दिनांक १, २, ३ असे तीन दिवस शुभ कसे जातील ते पाहा. कारण या दिवसांमध्ये आपण जे ठरवून काम करणार आहे तसे न होता दुसरेच काम करावे लागेल. त्यामुळे तुमचे काम राहून जाईल. आपले काम करण्यासाठी विनाकारण धावपळ होईल. नियोजन करून मग कामाला सुरुवात करा. महत्त्वाचे करार या दिवसांत करू नका. गरज आहे तेवढेच बोला. जबाबदारीने वागा. म्हणजे नुकसान होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील परिस्थिती सध्या चांगली असेल. मात्र व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाला कामातील त्रुटी वेळीच दूर कराव्या लागतील. अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात काम करण्याची सध्या उत्सुकता नसेल. पण काम करावे लागेल. कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर करा. प्रकृतीची काळजी घ्या.

मीन : तडजोड स्वीकारा
षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे दुधात मिठाचा खडा. म्हणजे काय वाईट होणार का? तर नाही. असे ग्रहमान असले की आपली विचार करण्याची पद्धतच बदलते. मनामध्ये नकारार्थी भावना निर्माण होते आणि चांगल्या गोष्टींसाठी जो प्रयत्न करत असतो तो सोडून देता. विनाकारण कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. अशा वेळी आपल्याला अशा गोष्टी फार सुचतात. स्वत:चे नुकसान करून घेता. ‘आपले काम भले आपण भले’ हे सूत्र लक्षात ठेवा. प्रयत्नांना कमी पडू नका. परिस्थिती कोणतीही असो पण तडजोड स्वीकारायला शिका. व्यवसायात सध्या गुंतवणूक न केलेली चांगली. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी असणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. आर्थिकदृष्ट्या खर्च जपून करा. घरगुती वातावरण आनंदी कसे राहील ते पाहा. स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्या.

 

 

 

(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *