राजस्थानमध्ये विदेशी कुत्र्यांवर सट्टा लावणारे 81 जण ताब्यात, 19 कुत्रे जप्त

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात कुत्र्यांवर सट्टा (Dog Fight Betting) लावणाऱ्या 81 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी ही घटना उघडकीस आली. हनुमानगड टाऊन पोलिस स्टेशन हद्दीतील एका फार्म हाऊसवर (Farm House) छापा टाकून पोलिसांनी विदेशी जातीचे 19 कुत्रे जप्त केले असून 15 वाहने जप्त केली आहेत.

शुक्रवारी रात्री उशिरा चक बुद्धसिंग वाला रोही येथील फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला तेथे विदेशी जातीच्या कुत्र्यांवर सट्टा खेळला गेला. पोलिसांचा छापा पडताच अनेकांनी भिंतीवर उड्या मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. काही लोकांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. सट्टेबाजी करताना पकडलेले बहुतेक आरोपी हे शेजारील पंजाब-हरियाणातील रहिवासी होते आणि त्यांनी खाजगी वाहनांमध्ये कुत्रे आणले होते.

काही कुत्रे जखमी अवस्थेत सापडले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. फार्म हाऊसमध्येच या कुत्र्यांना पोलिसांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा व जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेल्या आरोपींचा सोशल मीडियावर एक ग्रुप तयार होता. ज्यामध्ये सुमारे 250 सदस्य जोडलेले आहेत आणि हे सर्व लोक ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कुत्र्यांच्या सट्टेबाजीचे आयोजन करायचे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *