राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येतील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक फरार आहे. मात्र, या हत्येचा ठेका तीन नव्हे तर चार जणांनी घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सुपारी घेणारा चौथा व्यक्ती कोण? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी या वर्षी 2 सप्टेंबरपासून कुर्ला येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यापैकी एकजण फरार आहे. या घराचे भाडे दरमहा 14 हजार रुपये होते.
या आरोपींना बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी अडीच ते तीन लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. हत्येसाठी चार जणांना नियुक्त केले होते. यातील प्रत्येकाला 50,000 रुपये मिळणार होते. चार आरोपींपैकी तीन आरोपींना यापूर्वी पंजाबच्या तुरुंगात एकत्र ठेवण्यात आले होते, जिथे ते आधीपासून तुरुंगात असलेल्या बिश्नोई टोळीच्या सदस्याच्या संपर्कात आले होते. त्याच्या माध्यमातून तिन्ही आरोपी बिष्णोई टोळीत सामील झाले.
गुन्हे शाखेची पथके उज्जैन (मध्य प्रदेश), दिल्ली आणि हरियाणा येथे पाठवण्यात आली आहेत. क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी असेही उघड केले आहे की, सलमान खान गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी गोळीबार करण्यापूर्वी अशाच प्रकारच्या गुप्तहेरासाठी भाड्याच्या घरात राहिला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणा गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या लोकांचा दावा आहे की तो लॉरेन्स गँगशी संबंधित आहे. याची पुष्टी करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई यांची चौकशी केली जाऊ शकते. चौकशीसाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्याने त्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. बाबा सिद्दिकीच्या हत्येत 9 एमएम पिस्तुलचा वापर करण्यात आला होता.