उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये कारमध्ये कोंडल्याने गुदमरून एका 3 वर्षाच्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी तब्बल 4 तास कारमध्ये बंद पडून राहिल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला. मेरठ पोलिसांनी मुलीच्या मृत्यूप्रकरणी हिमाचल प्रदेशातील लान्स नाईक नरेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लष्करात तैनात असलेल्या लान्स नाईकने आपल्या मुलीला गाडीतून फिरायला नेल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. कंकरखेडा परिसरातील रोहता रोडवर नाईकने मुलीला कारमध्येच ठेवले आणि तो मित्रांसोबत पार्टी करायला गेला. यावेळी त्याने कार लॉक केली होती. त्यानंतर गाडीतच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. नरेशच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाने आपली एकुलती एक मुलगी गमावली. लान्स नाईक याच्या विरोधात निर्दोष हत्येचा अहवाल दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मुलीचे वडील सोमवीर पुनिया हे लष्करात असून ते हरियाणाचे रहिवासी आहेत. सध्या ते मेरठ कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात आहेत. तर आरोपी नरेश हा लष्करात लान्स नाईक असून तोही शेजारी राहतो. सोमवीर पुनिया यांनी पोलिसांना सांगितले की, 30 ऑक्टोबर रोजी त्यांची 3 वर्षांची मुलगी वर्तिका घराबाहेर खेळत होती. त्यावेळी काहीही कल्पना ण देता नरेश आपल्या मुलीला गाडीतून फिरायला घेऊन गेला. कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेतला असता नरेशच्या कारमध्ये ती बेशुद्धावस्थेत आढळून आली. मुलीला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.