शिराळ्यात शिक्षण व धर्मशिक्षणाच्या अनुषंगिक 21 जणांना जीवंत नाग प्रदर्शनास परवानगी देण्यात आली आहे. 21 अर्जदारांना नाग पकडणेसाठी 27 ते 31 जुलै 2025 या कालावधीत अटी शर्तीस अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे. शिराळा वनक्षेत्रातील 21 ग्रामस्थांनी अभ्यास / शिक्षण करणेकामी नाग पकडणेसाठी मंजूरीबाबत विहित नमुन्यात परवानगीची मागणी केलेली होती. त्यानुसार पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांचेकडून अटी शर्तीस अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे.
नेमक्या काय सूचना करण्यात आल्या आहेत?
दरम्यान, ही परवानगी केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच व स्थानिक लोकांमध्ये, समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपारीक ज्ञान प्रसारण होणेकामी अनुमती देण्यात आली आहे. यामध्ये कोणतीही व्यावसायीक किंवा मनोरंजन, स्पर्धा, मिरवणूक, खेळ, याला अटकाव करण्यात आलेला आहे. 21 अर्जदारांव्यतिरिक्त कोणीही नाग पकडल्यास तसेच स्पर्धा, मिरवणूक, खेळ, केल्याचे आढळून आल्यास त्यावर वन्यजीव अधिनियम, 1972 नुसार गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. तसेच ज्या अर्जदारांना परवानगी मिळालेली आहे त्यांनी सदरचे नाग पकडताना मुख्य वन्यजीव संरक्षक किंवा त्यांचेकडून अधिकृत केलेल्या अधिकायामार्फतच व वन व वन्यजीव अधिका-यांच्या उपस्थितीत करणेबाबत बंधन घालण्यात आले आहे. यामध्ये नागांचा एकही मृत्यू होणार नाही व नाग सुरक्षितपणे मूळ अधिवासात सोडणेबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत.
शिराळ्याची नागपंचमीची परंपरा जिवंत नागांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, काही वर्षांपासून या प्रदर्शनाला परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे, ग्रामस्थ पुन्हा एकदा जिवंत नागांच्या पूजेसाठी परवानगी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी केंद्रीय वनमंत्र्यांकडे मागणी केली असून, निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर 21 जणांना जीवंत नाग प्रदर्शनास परवानगी देण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्याला जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा ही शेकडो वर्षांपासून आले.नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा केली जायची आणि त्यांची मिरवणूक काढली जायची. पण प्राणी हक्क संघटनांच्या आक्षेपानंतर 2002 साली सर्वोच्च न्यायालयाने जिवंत नागाची पूजा बंद करण्याचे आदेश दिले आणि या प्रथेला खंड पडला होता. दरम्यान, बत्तीस शिराळामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा पुन्हा सुरू केली जाईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलं होतं.