तेलंगणातील (Telangana) नारायणपेट जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील (Government School) किमान 17 विद्यार्थ्यांना बुधवारी मध्यान्ह भोजनानंतर (Mid Day Meal) रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधित विद्यार्थ्यांपैकी 15 सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे, कारण निश्चित करण्याचे आणि जबाबदार व्यक्तींची ओळख पटवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विचारपूस करून त्यांची काळजी घेण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले असून अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहनही केले आहे.
दरम्यान, रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याच्या राज्याच्या बांधिलकीवर भर दिला आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. तसेच राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद शाळेतील 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी बुधवारी मध्यान्न भोजन घेतले.
जेवणानंतर, 17 विद्यार्थ्यांमध्ये उलट्या आणि डोकेदुखीसह लक्षणे आढळून आली, असे जिल्हा शैक्षणिक अधिकाऱ्याने सांगितले. पीडित विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जेथे 15 जण निरीक्षणाखाली आहेत. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे हा प्रकार घडला का? याचा तपास अधिकारी करत आहेत.