मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मौगंज (Mauganj) जिल्ह्यात चालत्या रुग्णवाहिकेत 16 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक समोर आली आहे. ही घटना 22 नोव्हेंबर रोजी घडली असून याप्रकरणी चालकासह चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती देताना उपमहानिरीक्षक (रेवा रेंज) साकेत पांडे यांनी सांगितले की, मुलगी तिची बहीण आणि मेव्हण्यासोबत रुग्णवाहिकेतून प्रवास करत होती.
रुग्णवाहिकेत तिघांव्यतिरिक्त एक चालक आणि त्याचा सहकारी होता. वाटेत मुलीची बहीण आणि मेव्हुणा पाणी आणण्याच्या बहाण्याने गाडीतून खाली उतरले. दरम्यान चालकाने रुग्णवाहिका वेगाने चालवली. सुनसान गावात पोहोचल्यानंतर चालत्या रुग्णवाहिकेचा चालक मदतनीस राजेश केवट याने मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीची बहिण आणि मेहुण्यावरही या गुन्ह्यात आरोपीची मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पांडे यांनी सांगितले की, मुलीला रात्रभर ओलीस ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले. घरी पोहोचल्यानंतर, पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. गुन्हा दाखल केला तर कुटुंबाचे नाव खराब होईल या भीतीने त्यांनी दोन दिवस पोलिसांकडे तक्रार दाखल केली नाही. परंतु, 25 नोव्हेंबर रोजी पीडिता आणि तिच्या आईने अखेर पोलिसांशी संपर्क साधला. पीडितेच्या आईने तक्रारीच्या आधारे कथित बलात्कारी (केवट) सह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्राप्त माहितीनुसार, रुग्णवाहिका चालक वीरेंद्र चतुर्वेदी आणि त्याचा सहकारी केवट या दोन आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली, तर मुलीची बहीण आणि मेव्हणा फरार आहेत. आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीची बहीण आणि मेव्हूण्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. सर्व आरोपींवर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.