ठाण्यात नुकताच उघडकीस आलेल्या बेकायदेशीर १६ हजार कोटींच्या हॅकिंग गैरव्यवहार प्रकरणात श्रीनगर पोलीस आणि नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पहिली अटक झाली आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील हवे असलेल्या पाच आरोपींपैकी अमोल मनोहर आंधळे उर्फ अमन या फरारी आरोपीला नौपाडा पोलिसांनी ठाण्यातून बुधवारी रात्री अटक केली आहे. नौपाडा आणि श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास सायबर सेल विभागाकडे आहे. श्रीनगर पोलीस ठाण्यात गेटवे पे कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये घुसखोरी करून तथाकथित व्यवहार आरोपींनी केला. तर नौपाडा पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने बोगस दस्तावेजावर बँक खाती उघडून आरोपींनी व्यवहार करत रक्कम परदेशात पाठवली.
नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाच आरोपींपैकी एक आरोपी अमोल मनोहर आंधळे उर्फ अमन याला बुधवारी (११ ऑक्टोबर) रोजी रात्री अटक केली. आरोपी अमोल आंधळे हा नौपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात फरारी होता. तो नौपाडा परिसरात फिरताना आढळला असता पोलिसांनी त्याला अटक केली. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. तर याच गुन्ह्यातील फरारी अन्य चार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बनावट दस्तावेजांच्या आधारावर बॅंक खाती उघडण्याची प्रकरणे यापूर्वीही उघडकीस आली आहेत. असंच एक प्रकरण जुलै, 2022 रोजी मुंबईत उघडकीस आलं होतं. या खात्यांचा वापर हवाला रकमेची अफरातफर करण्यासाठी केला जात होता. आर्थिक गुन्हे शाखेनं मोठ्या शिताफीनं या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली होती.