ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपुरक गणेशमुर्ती विसर्जन संकल्पनेस ठाणेकरांनी यंदाही प्रतिसाद देऊन बुधवारी दीड दिवसांच्या १३ हजार ९५५ गणेश मुर्तींचे कृत्रिम तलावाबरोबरच विशेष टाकी व्यवस्थेत विसर्जन केले. त्यापैकी कृत्रिम तलावात ९६८ तर, विशेष टाकी व्यवस्थेत १ हजार ७७ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले आहे. शहरातील गृहसंकुले, नागरीवस्ती अशा विविध ४२ ठिकाणी पालिकेने यंदा प्रथमच विशेष टाकी विसर्जन व्यवस्था निर्माण केली असून घराजवळच ही व्यवस्था असल्याने त्यास ठाणेकरांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहराची ही ओळख टिकविण्यासाठी पालिकेकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये तलाव परिसराचे सुशोभिकरण करण्याबरोबरच तलावातील पाणी प्रदुषित होऊ नये याकडे विशेष लक्ष दिले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते. या पर्यावरणपुरक गणेश मुर्ती विसर्जनास ठाणेकरांकडूनही दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येतो. यंदाही हेच चित्र कायम असल्याचे दीड दिवसांच्या गणेश मुर्ती विसर्जनादरम्यान दिसून आले आहे. शहरात दीड दिवस, पाच दिवस आणि सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेने व्यवस्था केली आहे.